मलकापूर : गुरुपौर्णिमेचा दिवस केवळ गुरुंच्या स्मरणापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरण मित्र परिवार, मलकापूर यांच्या वतीने कडुनिंबाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षलागवडीसोबतच त्याचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आयोजित या उपक्रमासाठी स्वप्निल निरखे यांनी कडुनिंबाचे रोप उपलब्ध करून देत सहकार्य केले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरण मित्र परिवाराच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी देवळे सर, धुमाळे बंधू, घनोते , अमित मावळे, रमेश जटाळे, गोपाल जटाळे, रेखाताई चवरे, कैलास गुरव, पंकज जैन, राजुभाऊ तांदूळे, राजू शिरसागर आणि विशाल राजपूत यांच्यासह पर्यावरण मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. भविष्यातही अशाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना सहकार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.