मलकापूर : “बालपण हे शिक्षणासाठी असते, मजुरीसाठी नाही,” या भूमिकेला बळ देणारी कारवाई मलकापुरात करण्यात आली. बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत कृतीदलाने शहरातील दोन आस्थापनांवर धाड टाकून तीन बालकामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित आस्थापन चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, बालमजुरीविरोधातील ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली आणि बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत गठित कृतीदलाने १५ जुलै रोजी मलकापूर येथे विशेष धाडसत्र राबविले. तपासणीदरम्यान मुक्ताईनगर रोडवरील दोन आस्थापनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचे उघड झाले. शिवाजीनगर परिसरातील मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस या आस्थापनात एक बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. तसेच ख्वाजा गरीब नवाज गॅरेज येथे दोन बालकामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले. कृतीदलाने तातडीने तिन्ही बालकामगारांची सुटका करून त्यांना संरक्षणात घेतले. संबंधित आस्थापन चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामगार विभागाने स्पष्ट केले की, बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांकडून बेकायदेशीररीत्या काम करून घेणे हा गंभीर गुन्हा असून, अधिनियमाच्या कलम १४ नुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. कोणत्याही आस्थापनात बालमजुरी होत असल्याची माहिती नागरिक, पोलीस किंवा सरकारी अधिकारी तक्रारीद्वारे देऊ शकतात. बालमजुरी ही सामाजिक अनिष्ट प्रथा असून तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोणत्याही परिस्थितीत बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. ही कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या निर्देशानुसार आणि कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक योगेश गोटे यांच्या पथकाने केली. कारवाईत कामगार विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच मलकापूर शहर पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.