जळगाव जामोद : खेर्डा खुर्द येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी घडली. शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेच्या खांबावरील ताणाच्या संपर्कात आल्याने २० वर्षीय संकेत प्रभाकर वेरुळकर याचा जागीच मृत्यू झाला. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनाने संपूर्ण खेर्डा खुर्द गाव शोकसागरात बुडाले असून महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत प्रभाकर वेरुळकर (वय २०, रा. खेर्डा खुर्द) हा आनंदा श्रीरंग वेरुळकर यांच्या गट क्रमांक ८५, वनूर शिवारातील शेतात पेरणीचे काम करत होता. यावेळी शेतातून गेलेल्या विजेच्या खांबाच्या ताणाच्या संपर्कात तो आला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. घटनेनंतर विजय वासनकर व इतर नागरिकांनी तातडीने त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात संकेतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, संकेत वेरुळकर हा आर्मी भरतीसाठी मेहनत घेत होता. त्याने मैदानी चाचणी यशस्वीरित्या पार केली होती आणि काही दिवसांत लेखी परीक्षा होणार होती. मात्र, त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्याचे देशसेवेचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, जीर्ण झालेले वीज खांब आणि धोकादायक विद्युत यंत्रणेमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक विद्युत वाहिन्या व खांबांची दुरुस्ती करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.