शिवानी कलमेकर बनावट हत्याकांडात मोठी कारवाई; दोन पोलीस निरीक्षक निलंबित

जळगाव जामोद : राज्यभर गाजलेल्या शिवानी कलमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात तपासातील गंभीर त्रुटी आणि हलगर्जीपणाची दखल घेत प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांना ७ जून रोजी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या शिवानी कलमेकर प्रकरणात सुरुवातीला तिची हत्या झाल्याचा समज करून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली होती. मात्र, पुढील तपासात कथित हत्येचा दावा खोटा असल्याचे समोर आले आणि संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.
या प्रकरणात मध्यप्रदेशातील बापुराम कलमेकर व त्यांचा मुलगा अजय कलमेकर यांना संशयित धरून तब्बल २२ दिवस कारागृहात ठेवण्यात आले होते. नंतर तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरांतून तीव्र टीका झाली होती. त्यानंतर अखेर संबंधित तपास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तथापि, या कारवाईनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असल्याचे पोलीस विभागाकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे केवळ दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपविण्यात येणार का, की तपास प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांच्या बुलढाणा दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार असून आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवानी कलमेकर प्रकरणामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेबरोबरच निष्पाप व्यक्तींना चुकीच्या तपासामुळे सहन करावा लागणारा मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर त्रास हा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अंतिम जबाबदारी निश्चित होईपर्यंत जनतेचे लक्ष पुढील घडामोडींवर कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!