नांदुरा:- शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर नांदुरा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत चार टिप्परांसह तब्बल ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्राम पिंप्री कोळी शिवारात करण्यात आली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉं. विक्रमसिंह राजपुत यांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही जण टिप्परच्या माध्यमातून विनापरवाना अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत आहेत. त्यानुसार नांदुरा पोलिसांनी २२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंप्री कोळी शिवार परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी चार टिप्परमधून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी रविंद्र प्रभाकर जाधव (रा. जवळा बाजार), मोहनगीर रामगीर गोसायी (रा. वडनेर भोलजी), जितेंद्र मधुकर देवकर (रा. हरसोडा) व जितेंद्र रविंद्र झनके (रा. बहापुरा) यांच्याविरुद्ध कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी चार टिप्पर व त्यामधील अंदाजे वाळूसाठा असा एकूण ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई पोहेकॉं. विक्रमसिंह राजपुत पोहेकॉं. अमोल खोंदील, पोका धनंजय वेरुळकर, पोका ईश्वर वाघ, पोका विनायक मानकर, पोका योगेश निंबोळकर, पोका विनोद भोजने, पोका रविंद्र झगरे तसेच नांदुरा पोलीस पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. पुढील तपास पोहेकॉं. अमोल खोंदील करीत आहेत.