शेतजमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा

चिखली : देवनगर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुमन विजय पवार या आपल्या भावाच्या मालकीच्या गट क्रमांक ३६ मधील शेती कसत आहेत. ५ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास त्या देवनगर शिवारातील शेतात दगड उचलण्याचे काम करत होत्या. त्याचवेळी जेसीबीच्या सहाय्याने शेत समतल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अमोल प्रभाकर पालकर याने घटनास्थळी येत जेसीबीचे काम थांबविले. त्यानंतर बंडू राऊत, बाबू राऊत, अमोल राऊत, अतुल राऊत व अक्षय राऊत हेही तेथे आले. आरोपींनी संबंधित शेतजमीन आमची असल्याचा दावा करत फिर्यादी महिलेस शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाद वाढत असताना अमोल पालकर याने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच बंडू राऊत याने त्यांच्या हाताला चावा घेतल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ गोविंद व विठ्ठल राठोड हे घटनास्थळी धावून आले. त्यावेळी आरोपींनी गोविंद राठोड यांना काठीने मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बिबी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!