खामगाव : – शहरातील एका एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने ग्राहकाचे एटीएम कार्ड बदलून तब्बल १ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, जलंब नाका परिसरातील रहिवासी ललेंद्र हरीभाऊ काबुकडे (वय ५०) हे ३ मे रोजी सायंकाळी बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या तिघांनी “व्यवहार पूर्ण झाला नाही” असे सांगत त्यांच्याशी बोलणे सुरू केले. विश्वास संपादन करून आरोपींनी काबुकडे यांना पुन्हा एटीएममध्ये नेले. यावेळी एका आरोपीने चलाखीने त्यांचे एटीएम कार्ड हातात घेत दुसरे कार्ड देऊन अदलाबदल केली. ही बाब लक्षात न आल्याने आरोपींनी त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांतून तब्बल १ लाख ३७ हजार रुपये काढून घेतले. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर काबुकडे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.