मलकापूर : तालुक्यातील नरवेल येथील ग्रामपंचायत परिसरात आज, ४ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. फिल्टरचे काम करत असताना शॉक लागून ३५ वर्षीय अमोल संजय पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मलकापूर शहरातील रहिवासी असलेले अमोल पाटील हे नरवेल येथील ग्रामपंचायतीत पाण्याच्या फिल्टरचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांना विजेचा जबरदस्त शॉक लागला. या धक्क्याने ते जागीच कोसळले. उपस्थितांनी तातडीने त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अमोल यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहीण तसेच १० वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा असा मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, वडिलांच्या प्रेमळ छत्रछायेखाली वाढणाऱ्या त्या दोन निष्पाप चिमुकल्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थितांचाही कंठ दाटून आला. अमोल यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, मदतीस तत्पर आणि सर्वांना आपलेसे करणारा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या ओठावर एकच वाक्य होते “असा माणूस पुन्हा होणे नाही…” उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी लोनवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने केवळ एक कुटुंब नव्हे, तर संपूर्ण परिसराने एक हसतमुख, जिवाभावाचा माणूस गमावला आहे.