निकालाच्या भीतीने उमलते आयुष्य संपले; साहिलला 60% गुण मिळाल्याची वेदनादायक वस्तुस्थिती

मलकापूर : “उद्या काय निकाल लागेल?” या एका विचाराने त्रस्त झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्याचा धागाच तोडून टाकल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मलकापूर शहरातील आकारेश्वर नगर येथे घडली. आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला साहील संजय राणे हा तरुण निकालाच्या तणावाला हरला… आणि आज त्याला ६० टक्के गुण मिळाल्याचे समोर आले हीच बाब कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे.
माहितीनुसार, साहील हा वाकोडे येथील विविध विकास ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. २ मे रोजी लागणाऱ्या निकालाबाबत तो काही दिवसांपासून चिंतेत होता. १ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने घरातील बेडरूममध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. घरात काही क्षणातच सगळं शांत झालं… पण त्या शांततेत एका कुटुंबाचा आक्रोश दडलेला होता. घटनेची माहिती मिळताच वडील व कुटुंबीयांनी धाव घेतली. वडिलांनी स्वतःच्या हाताने मुलाला खाली उतरवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डोळ्यासमोरचा लाडका मुलगा निःशब्द पडलेला पाहून घरात हंबरडा फोडला गेला. ही घटना परिसरातील प्रत्येकाला अस्वस्थ करून गेली. मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, निकालाच्या भीतीमुळेच साहीलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, २ मे रोजी म्हणजेच आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात साहीलला ६० टक्के गुण मिळाल्याचे त्याच्या शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!