जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; दोन जण जेरबंद, मोबाईलसह रोकड जप्त

शेगाव : शहर पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे संविधान चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत मोबाईल, रोकड व इतर साहित्य असा जवळपास २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ ते ५.५५ वाजताच्या दरम्यान ज्योतिबा सदन येथे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनी यशोदा कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईत उमेश महादेव खेरडे (३१, रा. माळीपुरा) आणि बंडू रघुनाथ कंकाळे (३१, रा. ताडपुरा) यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यात आरोपींकडून विविध कंपन्यांचे अँड्रॉइड व साधे मोबाईल फोन, जुगारासाठी वापरण्यात येणारे रजिस्टर, बॉलपेन तसेच रोख रक्कम असा एकूण १९,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मोबाईलमध्ये सॅमसंग, विवो, लावा व हिरो कंपनीच्या हँडसेटचा समावेश असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात म. जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोहेका सुरेंद्र सिंग चव्हाण करीत आहेत. कारवाई पंचांच्या उपस्थितीत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!