मलकापूर : शहरातील बुलढाणा रोड परिसरात रात्रीच्या वेळी भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीने मागून धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव राजेंद्र वाशीमकर (रा. वृंदावन नगर, मोताळा, ह.मु. माता महाकाली नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २९ मार्च रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता ते आपल्या साला भुषण संतोष बानाइत याच्यासोबत मोटारसायकल क्र. एमएच २८ सीबी १०१३ ने बुलढाणा रोडवरून बसस्थानकाच्या दिशेने जात होते. दरम्यान, तुलसी ज्वेलर्स समोर अचानक मागून आलेल्या अज्ञात मोटारसायकल चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवित त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गाडीसह रस्त्यावर पडून जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित अज्ञात चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा क्र. २३२/२०२६ अन्वये कलम २८१, १२५ (अ) भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अमोल शेले करीत आहेत.