रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे शेतात काम करत असताना आगेमोहळच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढवल्याने एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास अचानक पुढे असलेल्या झाडांजवळील आगेमोहळच्या पोळ्यातून मोठ्या संख्येने मदमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी सुरोशे यांच्यावर हल्ला चढविला. मदमाशांनी शरीरावर अनेक ठिकाणी दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र मदमाशांच्या तीव्र दंशामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोहम सुरोशे यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे तसेच भाऊ-भावजया असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे.