चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूतील घटना

मलकापूर : चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजय भावराव तायडे (वय २५) रा. काळेगाव ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस संपल्यामुळे त्यांनी घराजवळ चुल पेटवून स्वयंपाक सुरू केला होता. यावेळी चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याचे सांगत शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींनी त्यांना जाब विचारला.
यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण होऊन तो पुढे वाढत गेला. तक्रारीनुसार आरोपी विजय शंकर दाभाळे, अजय शंकर दाभाळे, अविनाश शंकर दाभाळे आणि सुनीता विजय दाभाळे (सर्व रा. काळेगाव ता. मलकापूर) यांनी फिर्यादीला चापटांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर वार करून जखमी केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेदरम्यान फिर्यादीची आई व पत्नी यांनाही ढकलाढकली करून शिवीगाळ करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप.क्र. १९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ विक्रम राजपूत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!