किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हिंसक वळण घेत एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास शेतातून घरी परतत असताना जयअंबे नगर परिसरात आरोपी प्रकाश मेतकर याने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. वाद वाढताच संतापलेल्या प्रकाश मेतकर याने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात म्हस्के जखमी झाले.
दरम्यान, घटनास्थळी आरोपीची आई व बहीण सोनाली आल्या. त्यांनीही फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ‘त्याला मारून टाका’ असे उद्‌गार काढून हल्ल्यास उत्तेजन दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तत्काळ मध्यस्थी करून जखमी म्हस्के यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आरोपी प्रकाश मेतकर, त्याची आई व बहीण सोनाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!