मलकापूर : देवधाबा येथील एका २५ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सुनील कावळकर (वय २५, रा. देवधाबा) या तरुणाने २३ मार्चच्या सुमारास अज्ञात कारणावरून विष प्राशन केले होते. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईक शिवाजी शांताराम कावळकर यांनी त्याला तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार कक्ष सेवक राजू तुकाराम गोमटे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला मेमो दिला. त्यावरून पोलिसांनी २८ मार्च रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.