मलकापूर :- माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे वडील तथा धुपेश्वर संस्थानचे अध्यक्ष आणि मलकापूर जिल्हा सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ स्व. ॲड. महादेवसिंह चंद्रसिंह रावळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ माता महाकाली नगर येथील स्व. लक्ष्मण हिरु चव्हाण वैकुंठधाम परिसरात 84 वृक्षांची लागवड करण्यात आली. स्व. ॲड. महादेवसिंह रावळ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यानंतर 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम येथे रक्षा सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल गांधी, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) संतोष डिवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उबाठा) गजानन ठोसर, मलकापूर आजतकचे संपादक विरसिंहदादा राजपुत, ॲड. जी. डी. पाटील, ॲड. मनीष शर्मा, ॲड. दिलीप बगाडे, ॲड. विजयसिंह राजपुत, ॲड. रविंद्र निकम, माजी नगरसेवक अनिल बगाडे,माजी नगरसेवक सुनील बगाडे, संजयसिंह राजपुत, किशोर गणबास, अंकुश भोंबे, तेजराव रायपुरे, महादेव लटके आदी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ व कडुलिंब यांसह एकूण ८४ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी लावण्यात आलेली सर्व झाडे जगविण्याचा संकल्प नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल गांधी यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे स्व. ॲड. महादेवसिंह रावळ यांच्या स्मृतीला पर्यावरणपूरक श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.