मलकापूर : विज्ञान म्हणजे प्रगतीची गुरुकिल्ली आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी या संदेशासह नूतन इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, जिज्ञासेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संजय महाजन सर व प्रा. रीता वराडे मॅडम (नूतन विद्यालय, मलकापूर) उपस्थित होते. लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे संचालक डॉ. गौरव कोलते यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य अमोल चोपडे व प्रदीप कोलते यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. विज्ञान शिक्षक अमोघ घाटे, सौ. पूनम पोरवाड, सौ. शितल अरबट, अपूर्वा जैन, अश्विनी पांडे तसेच इतर शिक्षक-शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा, जलशुद्धीकरण, रोबोटिक्स, विज्ञानातील नवकल्पना आदी विषयांवर आधारित आकर्षक व माहितीपूर्ण प्रकल्प सादर केले. विविध मॉडेल्स आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची उपयुक्तता प्रभावीपणे मांडली. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे अभिनंदन करताना वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे नसून जीवन समजून घेण्याचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन प्रा. महाजन यांनी केले. डॉ. गौरव कोलते यांनीही विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती जोपासून समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी वर्ग तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरली असून, नूतन इंग्लिश स्कूलने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करताना विज्ञानाबद्दलची जिज्ञासा आणि नवोपक्रमाची भावना अधिक दृढ केली आहे.