खामगाव : प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील पेंडका पातोंडा येथे दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन मुलासह त्याच्या आईवर लोखंडी रॉड व काठीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मोरखडे रा. गोळेगाव ता. शेगाव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांचा भाचा अमोल दहिभाते याचे शेगाव तालुक्यातील एका गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी अमोल यास त्याच्या आईने फोन करून “मुलीचे वडील व नातेवाईक घरासमोर येऊन वाद घालत आहेत, तू तात्काळ घरी ये,” असे सांगितले. त्यानुसार अमोल घरी पोहोचला असता, अंबादास राऊत हे लाकडी काठी घेऊन तसेच संतोष अंबादास राऊत हे लोखंडी रॉड घेऊन अमोलच्या आईवर धावून आले. त्यांनी काठी व रॉडने मारहाण करून तिला जखमी केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलिस पाटील यांनी मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अमोललाही त्याच्या काकांनी बोलावून घेतले. मात्र काही वेळातच श्रीधर राऊत व अक्षय राऊत पुन्हा घटनास्थळी आले व त्यांनी अमोलला काठीने मारहाण केली. याच वेळी संबंधित मुलीसह काही महिलांनी मिळून अमोलच्या आईला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेत अमोल व त्याची आई जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रेमसंबंधाच्या कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तक्रारीवरून पोलिसांनी अंबादास राऊत, संतोष राऊत, महादेव राऊत, चंदू राऊत, श्रीधर राऊत, अक्षय राऊत, संबंधित मुलीसह पाच महिला व विजय राऊत अशा एकूण १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), १८९(२), १८९(४), ७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.