वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, एका १९ वर्षीय नवविवाहितेचा तिच्याच सख्ख्या सासऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात आरोपी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर ती सासरी नांदायला आली होती. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र त्यानंतर सासऱ्याने घरच्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत तिच्यावर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली. मे २०२५ मध्ये एक दिवस घरात कोणी नसताना आरोपीने तिच्या खोलीत जाऊन जबरदस्तीने विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर आरोपीने कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यामुळे भीतीपोटी पीडिता गप्प राहिली. मात्र सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर तिने धैर्य एकवटत २ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची भावना असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
