मलकापूर –“नित्य नियमाने व्यायाम करणं म्हणजे निरोगी आरोग्याचं लक्षण” अशी सामान्य धारणा असतानाच मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगरातील ५० वर्षीय मनोज टाक यांच्या अकस्मात निधनाने शहर हादरलं आहे. व्यायाम, शिस्त आणि सुसंवाद या गुणांनी सर्वांना आपलंसं करणाऱ्या मनोज टाक यांचा मृत्यू नेमका हाच प्रश्न उपस्थित करतो की, जीवन किती अनिश्चित आहे!
सम्राट व्यायामशाळेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि दररोज नियमित व्यायाम करणारे मनोज टाक नेहमीप्रमाणे काल (५ जून) सकाळी व्यायाम करून घरी गेले होते. मात्र त्यानंतर काही तासांतच, दुपारच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, गोड बोलणारे आणि मदतीला तत्पर असलेले मनोज टाक यांनी आपल्या संवादातून अनेकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने सम्राट व्यायामशाळेतील तसेच परिसरातील मंडळींमध्ये दुःख आणि धक्का व्यक्त केला जात आहे.