नांदुरा( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ): नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकमधील युवकाला नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी (२८, रा. खारमनी, जि. बेळगाव, कर्नाटक) याने नांदुरा येथील अक्षय देविदास सातव (२६, रा. खुमगाव बुर्टी) यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वारंवार मुलाखतीसाठी कर्नाटकातील बेळगाव येथे बोलावले आणि कन्सल्टन्सीच्या माध्यमातून नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, तीन वर्षे उलटूनही नोकरी न मिळाल्याने सातव यांना फसवणुकीची जाणीव झाली. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी नोकरीच्या आमिषाला बळी न पडण्याचे आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी सत्यता पडताळण्याचे आवाहन नांदुरा ठाणेदार विलास पाटील यांनी केले आहे.