मलकापूर : – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मातोश्री जिनिंग अॅण्ड प्रेसिंग येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सरकी, रुई आणि कवडी यासह मोठ्या प्रमाणात साहित्य आगीत भस्मसात झाले. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावरील महाबीज कार्यालयाच्या लाईनमध्ये असलेल्या कोचर यांच्या मालकीच्या या जिनिंग प्रेसिंगमध्ये दुपारच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर आणि खामगाव येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे सांगितले जात आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.