मलकापूर:- इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी फुटून त्यामधील ऍसिड उडून पितापुत्र जखमी झाल्याची घटना काल दि. 11 जून रोजी रात्री 12.30 च्या सुमारास शहरातील पद्मालय सोसायटीत घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
पद्मश्री डॉक्टर व्हि बी कोलते अभियांत्रिक महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य विशाल सुभाष वैद्य शहरातील पद्मावत सोसायटी वास्तव्यास आहे. विशाल वैद्य यांच्याकडे इलेक्ट्रिक स्कुटी आहे. ते नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेस स्कुटी चार्जिंगला लावतात. मात्र आज रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरामध्ये मोठा स्फोट झाला. या कर्कश आवाजाने घरातील व परिसरातील सर्वच घाबरून गेले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्पोट झाल्याचे समजले. हे बघण्यासाठी विशाल वैद्य व त्यांचा मुलगा गेला असता त्यांच्या अंगावर बॅटरी मधील ॲसिड उडून दोघे पिता-पुत्र जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांची तारांबळ उडाली होती.