मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या स्काऊट विद्यार्थ्यांनी दिनांक 15, 16 व 17 जानेवारी 2025 रोजी घाटबोरी येथे आयोजित भारत स्काऊट आणि गाईड संघटना बुलडाणा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला.
या मेळाव्यात शाळेच्या एकूण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्काऊटर श्री. मंगलसिंग सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. वर्षभर स्काऊट च्या माध्यमातून चालविलेल्या उपक्रमांसाठी कामगिरीमुळे स्काऊटर श्री. मंगलसिंग सोळंके यांना “बेस्ट स्काऊटर” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे मागील वर्षीही चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला होता. यामध्ये स्काऊट मार्चिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, कवायत, शारीरिक प्राथमिकता, सहभोजन, तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा इत्यादी स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये दाखवून गौरव प्राप्त केला.
सर्व विद्यार्थ्यांना भारत स्काऊट गाईडतर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी अभिनंदन केले.