मलकापूर : लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर द्वारा संचालित प्राथमिक मराठी आमची शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. माही अनिल नारखेडे हिने सायन्स ऑलंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ऑलंपियाड या स्पर्धेत तिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. माही हिने या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल रँक, झोनल रँक, आणि स्कूल रँक अशा सर्व स्तरांवर प्रथम क्रमांक प्राप्त करत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग त्याचं कौतुक करत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता पाटील मॅडम आणि संस्थेचे समस्त संचालक यांनी तिच्या कष्टाला आणि मेहनतीला सलाम केला आहे.
माहीच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळाले असून, तिच्या कामगिरीने शाळेचा अभिमान वाढवला आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात तिच्या यशाची गोड कहाणी प्रेरणादायी ठरली आहे.