मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे ‘लैंगिक समता आणि विशाखा मार्गदर्शक तत्त्वे’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक स्फूर्तिदायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘विशाखा समिती व अंतर्गत तक्रार समिती’ अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक समतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शिक्षण संस्थांमध्ये महिला हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे पालन कसे करावे याबद्दल सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अनैतिक मानव तस्करी कक्ष, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय समन्वयक श्री. अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. आपल्या भाषणाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक समतेचे महत्त्व पटवून दिले तसेच विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचे सखोल विश्लेषण केले. महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना होणाऱ्या अन्याय व अत्याचारांपासून संरक्षण देण्यासाठी या तत्त्वांचा उपयोग कसा करावा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी असतानाच आपण या तत्त्वांचे महत्त्व समजून घेतल्यास भविष्यातील कार्यक्षेत्रात त्याचा योग्य प्रकारे उपयोग होऊ शकतो.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. खर्चे यांनी विद्यार्थ्यांनी लैंगिक समानता व महिलांच्या हक्कांचे संरक्षण ही केवळ कर्तव्यच नव्हे, तर एक नैतिक जबाबदारी मानली पाहिजे असे सांगितले. महाविद्यालयात महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात ठामपणे व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नेहा मालोकार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली,प्रा. नेहा मालोकार यांनी केले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना या सत्राचे उद्दिष्ट सांगण्यात आले आणि कार्यक्रमाच्या शीर्षकाचे व त्यामागील विचारांचे महत्व स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल व प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांना लैंगिक समानतेच्या प्रश्नांबद्दल समृद्ध माहिती मिळाली तसेच विशाखा तत्त्वांची ओळख पटली. या कार्यक्रमास सिव्हिल, मेकॅनिकॅल, इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील सुमारे १२० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. नितीन खर्चे, श्रीमती एस. जी. नाफडे, प्रा. एस. एस. पवार, प्रा. पी. डी. पत्ते, प्रा. एस. जी. बोंडे, प्रा. पी. के. पाटील आणि प्रा. आर. आर. सरोदे यांनी देखील उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली.
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लैंगिक समता आणि विशाखा मार्गदर्शक तत्त्वे’ विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम
