मलकापूर : ढोल-ताशांचा कडकडाट, फुलांची उधळण, आकर्षक सजावट आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने सोमवारी (१४ सप्टेंबर) मलकापूर शहर अक्षरशः दुमदुमून गेले. सकाळपासूनच शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये गणरायांच्या आगमनाची लगबग सुरू होती. भक्तिमय वातावरणात वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकांनी शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे आणि जल्लोषाचे चित्र निर्माण केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच विविध मंडळांकडून गणरायांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचे पथक आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आगमन सोहळ्याला विशेष रंगत आली. शहरातील हनुमान चौकचा राजा, संत ज्ञानेश्वर नगरचा राजा, छत्रपती शिवाजी नगरचा राजा, रामवाडीचा राजा, कुलमखेडचा राजा, बाजीप्रभू नगरचा राजा, सालीपुरा नगरचा राजा, मलकापूरचा राजा यासह विविध गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात गणरायांचे स्वागत केले. गणेशमूर्तींच्या आगमनाच्या मिरवणुकीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, तर गणरायांच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. अनेक ठिकाणी गणरायांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मलकापूर शहर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. गणरायांच्या आगमनाचा हा सोहळा शांततेत, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. शहरातील विविध भागांतून निघालेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांमुळे मलकापूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पहिल्याच दिवशी शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.