मलकापूर : शहरातील पंतनगर परिसरात भरदुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोन्याची अंगठी असा तब्बल ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ११ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पंतनगरातील रहिवासी डॉ. राहुल राजधर मेढे यांच्या घरात दुपारी २.३० ते ३ वाजेदरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून अलमारीत ठेवलेल्या पर्समधून २८ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच पाच ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची अंगठी, अंदाजे ३२ हजार रुपये किमतीची, असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. घरातील ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. मेढे यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.