भाडगणी : गावात चोरीच्या घटनांची भीती वाढत असताना ग्रामपंचायतीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अनेक भागांमध्ये अद्याप पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोरट्यांना अंधाराचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावात CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी होत असतानाच अनेक ठिकाणी साधे पथदिवेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गावाच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. चोरीची घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा चोरीच्या घटना रोखण्यासाठी आधीच गावातील संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे आणि पथदिवे बसविणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने तातडीने पाहणी करून अंधार असलेल्या ठिकाणी पथदिवे सुरू करावेत, तसेच आवश्यक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या मागण्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन कधी गांभीर्याने लक्ष देणार, असा सवाल भाडगणी ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.