मलकापूर : अपुरा पाऊस, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि आता पुन्हा पावसाने दिलेली दीर्घ उघडीप यामुळे मलकापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मलकापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून महिन्यात पेरणीच्या काळात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागातील पिकांचे नुकसान झाले. मागील दीड महिन्यापासून पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह कोरडवाहू पिके सुकण्याच्या स्थितीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे, त्यांना नुकसानभरपाईचा लाभ तातडीने मिळावा, अशीही मागणी करण्यात आली. तसेच शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही काही बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा)च्या वतीने देण्यात आला आहे.
हे निवेदन तहसीलदार समाधान सोनवणे यांना ३१ ऑगस्ट रोजी देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, विभागप्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख विजय झांबरे, रफीकभाई पजायेवाले, ओंकार पाटील यांच्यासह शेतकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.