( वृतसंस्था )अकोला : सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे खदान पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई गणेश रामराव पाटील यांना भोवले आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या आदेशानुसार पोलिस शिपाई गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.खदान पोलिस ठाण्यात कार्यरत गणेश पाटील (३३), रा.सूर्या हाइट्स अपार्टमेंट खडकी यांनी त्यांचा मुलगा तन्मय (१) याचा नरबळी देण्याच्या उद्देशातून कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार ९ जुलै रोजी दुपारी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने गणेश पाटील यांची आई, पत्नी व मुलगा तन्मय यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता, त्यांनी सांगीतले की, त्यांचे पती गणेश हे दारू पिऊन जिवे मारण्याची धमकी देत होते. भीतीपोटी आम्ही तिघे घरासमोरील एका निर्माणाधीन अपार्टमेंटमध्ये लपून बसलो असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पाटील यांची आई लताबाई रामराव पाटील पोलिसांत तक्रार देत असताना ड्यूटी ऑफिसर सुनील दाभाडे यांना आरोपी गणेश पाटील याने दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ सुरू केली. या प्रकरणी गणेश पाटील याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२,२९६,३५१ (२) (३) नुसार, तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१), (आर) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.