Headlines

मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन दुकाने फोडून ऐवज लंपास ज्वेलर्समधून चांदीचे दागिने व डीव्हीआर, मेडिकलमधून रोकड चोरी

मेहकर : शहरातील मुख्य बाजारपेठेसह विठ्ठलनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण ज्वेलर्सचे शटर फोडून चांदीचे दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर, तर मेडिकल स्टोअरमधून रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जुन्या तहसील कार्यालयाजवळील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रशेखर वसंतराव काटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चॅनेल गेट व शटरची कुलपे तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. दुकानाची पाहणी केली असता चोरट्यांनी ३५० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले.
दरम्यान, विठ्ठलनगर परिसरातील दीपक लक्ष्मण गायकवाड यांच्या मेडिकल स्टोअरलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे शटर तोडून आतील चार हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. या दोन्ही घटनांप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार राजेंद्र काळे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!