Headlines

अन्नदात्यांचा सन्मान, सेवेचा अभिमान; जाणीव फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त शेतकरी गौरव

मलकापूर :- समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जाणीव फाऊंडेशनने आपल्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त दिव्यांग महिला शेतकऱ्यासह दोन कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा सन्मान करून अन्नदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दाताळा येथे झालेल्या या गौरव सोहळ्यात शाल, टोपी, श्रीफळ व रोख सन्मान देत शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
दि. ३ जुलै रोजी दाताळा येथे आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात दिव्यांग महिला शेतकरी कविता महादेव डोबाळे (रा. रिधोरा) तसेच गजानन मधुकर मुके (रा. घुस्सर) यांचा शाल, टोपी, श्रीफळ आणि १,००१ रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान सोहळा जाणीव फाऊंडेशनचे सदस्य ॲड. सतीश भिसे पाटील व वैभव वनारे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश वर्मा, विशालसिंह गौर, प्रदीप मानकर, राजेश मोडक, नीता वायकोले, नंदू जाधव, शिवा कडूकार, आधारसिंह राजपूत, विजय गोरे, विजय अंबाडकर, स्वप्नील वाघमारे आणि मनोज यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, उच्चशिक्षित तरुण स्वतःच्या व्यवसाय, नोकरी व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाजातील गरजू, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी वेळ देत आहेत, हीच जाणीव फाऊंडेशनच्या कार्याची खरी ताकद आहे. फाऊंडेशनच्या वतीने प्रांजली धोरण यांनी सांगितले की, “एका विचारातून सुरू झालेला सामाजिक प्रवास आज ९ व्या वर्धापनदिनापर्यंत सातत्याने पोहोचला, हे आमच्यासाठी मोठे समाधान आहे. आम्ही मोठेपणाचा दिखावा न करता छोट्या-छोट्या कृतीतून समाजासाठी काम केले. स्वतःसाठी प्रत्येकजण जगतो; मात्र दुसऱ्यांसाठी काही करण्याची जाणीव कृतीत उतरवणे, हाच आमचा खरा अभिमान आहे. सुरुवातीपासून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.” “कृतीतून समाधानात उमटते तीच खरी जाणीव” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन समाजहिताचे उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!