Headlines

लग्नाच्या मंडपात पोलिसांची एंट्री; १४ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबविला; ११२ वर मिळालेल्या माहितीमुळे बुलढाणा शहर पोलिसांची तातडीची कारवाई

बुलढाणा : समाजात अजूनही बालविवाहाच्या घटना समोर येत असतानाच बुलढाणा शहर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. डायल ११२ वरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट लग्नस्थळी धडक देत होणारा बालविवाह रोखला. ही घटना शुक्रवारी (१५ मे) बुलढाणा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील माळविहीर शिवार, खामगाव रोडवरील संतनगरी परिसरात उघडकीस आली. संबंधित ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली.
शहर पोलिसांनी महिला व बालविकास विभाग तसेच चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान मुलगी केवळ १४ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी विवाह सोहळा थांबवून संबंधितांना कायद्याची माहिती दिली. तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. बालविवाहासारख्या सामाजिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात सपोनि युवराज रबडे, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिता आराख, पोलिस नाईक सतीश पवार आणि पोलिस कॉन्स्टेबल विकास सुरडकर यांनी सहभाग घेतला.
“अल्पवयीन मुलांचे विवाह करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. अशा घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस किंवा चाईल्ड हेल्पलाईनला माहिती द्यावी,” असे आवाहन पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!