मोताळा :- तालुक्यातील बोराखेडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून शेळ्या-बोकडांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भास्कर रामकृष्ण भिवटे हे शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांच्या घराजवळील टिनशेड व लोखंडी जाळीच्या गोठ्यात सुमारे ३० शेळ्या व बोकड ठेवले होते. ३ मे रोजी सायंकाळी त्यांनी जनावरांना चारापाणी करून गोठा बंद केला होता. मध्यरात्री पाहणीदरम्यान सर्व जनावरे सुरक्षित होती. मात्र, ४ मे रोजी पहाटे गोठ्याचे कुलूप तुटलेले आढळून आले. पुढील तपासात ७ बोकड व ९ शेळ्या चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. परिसरात शोध घेऊनही जनावरे मिळून आली नाहीत. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, तालुक्यात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.