मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात पुलाजवळ निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पुलाबाहेरील रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांची मोठी रांग लागत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी दोन वाहतूक कर्मचारी उपस्थित असतानाही कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. यातील एक वयोवृद्ध कर्मचारी मात्र भर उन्हातही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतो. तो वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्नशील असून, त्याचे काम नागरिकांच्या नजरेतून सुटलेले नाही. मात्र दुसरा कर्मचारी सक्षम असूनही केवळ उभे राहून परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा कर्मचारी कामापेक्षा दिखावा करण्यात अधिक व्यस्त असल्याचे दिसून येते. दरम्यान, याच कर्मचाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराकडून 1000 रुपये घेऊन चलन पावती न दिल्याचा गंभीर आरोपही चर्चेत आहे. या प्रकारामुळे वाहतूक विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.