मलकापूर ( दिपक इटणारे ): तालुक्यात प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना अवघ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल ४४ अंश तापमानात घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टीनपत्र्याच्या खोलीत लहान विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेतल्याने संतप्त पालकांनी “उष्माघात झाला असता तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयात ही परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी एकूण ८ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ५ खोल्या खालच्या मजल्यावर तर ३ खोल्या वरच्या मजल्यावरील टीनपत्र्याच्या छपराखाली होत्या. एकूण १९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळी साडेदहा ते साडेबाराच्या दरम्यान मराठी आणि गणित या विषयांचा १५० गुणांचा पेपर झाला. याच काळात बाहेरचे तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले होते. टीनपत्र्याच्या खोलीत उष्णता अधिकच वाढल्याने त्या खोलीत बसलेल्या विद्यार्थ्यांना असह्य त्रास सहन करावा लागला. एवढ्या लहान वयाच्या मुलांना अशा परिस्थितीत बसवणे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. यानंतर दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर होता. मात्र, हा संपूर्ण प्रकार दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. तोपर्यंत दोन पेपर अत्यंत उष्णतेत पार पडले होते. यामुळे पालकांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पत्रकार घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा घेताच शाळा प्रशासनाची धावपळ उडाली आणि विद्यार्थ्यांना तातडीने दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले. या संदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, हरिदास गणबास यांनी सुद्धा भ्रमणध्वनी द्वारा गट शिक्षण अधिकारी फाळके याच्याशी संपर्क केला. अचानक झालेल्या या बदलामुळे आधीच उष्णतेने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, जर आधी झालेल्या दोन पेपरदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला उष्माघात किंवा अन्य आरोग्य समस्या उद्भवली असती, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणावर टाकायची, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, परीक्षा नियोजनातील या गंभीर निष्काळजीपणाबाबत संबंधितांवर कारवाई करावी आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच परीक्षा आयोजित कराव्यात, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.