मलकापूर ( उमेश इटणारे ) :- शहरात डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गल्लोगल्ली वाढलेल्या डासांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेकडून डास नियंत्रणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः धूर फवारणी नियमितपणे होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांची भीती वाढली आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. पालिकेला नागरिकांच्या आरोग्याची काहीही काळजी नाही, असा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने धूर फवारणी, स्वच्छता मोहीम आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.