जुन्या वादाचा राग अनावर; महिलेला दगडाने मारहाण, शेगाव येथील घटना

शेगाव : शहरातील गणेश नगर परिसरात जुन्या वादातून एका महिलेला मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा मंगेश माळी (वय ३७, रा. गणेश नगर) या १४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाकडे जात असताना आरोपी दुर्गा महादेव माळी व महादेव भास्कर माळी (दोन्ही रा. गणेश नगर) यांनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना अडवले. सुरुवातीला दोघांनी शिवीगाळ करत वाद घातला. फिर्यादीने याबाबत जाब विचारताच आरोपींनी संतापून त्यांना लोटपाट करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान आरोपींपैकी एकाने हातातील दगड त्यांच्या डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखमेवरून रक्तस्त्राव झाला असून काही वेळ त्यांना अंधारी आल्यासारखेही वाटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. २३६/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!