मलकापूर :- दसरखेड परिसरातील बेंजो केमिकल कंपनीच्या आवारात काम करत असताना विजेचा धक्का लागून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील वाघुडा येथील अर्जुन शंकर सरदार (वय 18) हा युवक बेंजो केमिकल कंपनीत कंत्राटदारामार्फत ठेकेदारी पद्धतीने बांधकामाचे काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर अर्जुन हातपाय धुण्यासाठी उभा असताना जवळच असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला त्याचा हात लागला. यावेळी अचानक जोराचा विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला.
घटनेनंतर सहकारी कामगार व नागरिकांनी तातडीने अर्जुनला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. अर्जुनच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अर्जुन सरदार हा गरीब कुटुंबातील कर्ता युवक असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सरदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सभापती अशांत वानखडे, संतोष रायपुरे, बाळू पाटील, विजय साठे आणि संदीप लष्करे यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.