मलकापूर : शहरात गेल्या काही तासांपासून रिलायन्स जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अचानक नेटवर्क गायब झाल्याने फोन कॉल, एसएमएस तसेच इंटरनेट सेवा बंद पडली असून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
व्यवसायिक, विद्यार्थी, पत्रकार, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात जिओ नेटवर्कवर अवलंबून असल्याने या तांत्रिक बिघाडाचा फटका सर्वाधिक बसला आहे. बँक व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, महत्त्वाचे फोन कॉल तसेच आपत्कालीन संपर्क साधण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरातील अनेक भागांत सकाळपासूनच नेटवर्क समस्या जाणवत असून नागरिकांनी जिओ कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही पुढे येत आहे. अचानक सेवा बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, जिओ प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा सेवा पूर्ववत होण्याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही अडचण आणखी किती काळ कायम राहणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शहरात वारंवार अशा प्रकारे नेटवर्क सेवा ठप्प होणे ही गंभीर बाब असून ग्राहकांकडून तात्काळ सेवा पूर्ववत करण्याची आणि बिघाडाचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे.