सोनाळा : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा मातृत्वाचा आक्रोश आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे भयावह वास्तव समोर आले आहे. जन्माला येऊन अवघा महिना पूर्ण होण्याआधीच एका निष्पाप आदिवासी बालिकेचा मृत्यू झाला. आईच्या कुशीत खेळण्याआधीच काळाने तिचा घास घेतला. हा केवळ एक मृत्यू नाही, तर आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेला रक्तरंजित ठसा आहे.
४ फेब्रुवारी रोजी सोनाळा येथील एका शेतात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबातील एका महिन्याच्या नवजात बालिकेचा अचानक मृत्यू झाला. नजीकच्या आदिवासी गाव रोहिणखिडकी (शेंबा) येथील डावर कुटुंब शेतमजुरीसाठी सोनाळा येथील वानखडे यांच्या शेतात वास्तव्यास आहे. याच ठिकाणी ४ जानेवारी रोजी बालिकेचा जन्म झाला होता. जन्मानंतर बालिकेवर सोनाळा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र आरोग्याची परिस्थिती बरी न होता अखेर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतातील झोपडीतच तिचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे नाव कु. शिवाणी देवा डावर असे आहे. या संपूर्ण घटनेत धक्कादायक बाब म्हणजे या बालमृत्यूबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णतः अनभिज्ञ आहे. नवजात मृत्यू घडूनही आरोग्य यंत्रणेपर्यंत वेळेवर माहिती पोहोचत नाही, हेच प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक आहे. संग्रामपूर तालुका हा जणू उपजत व नवजात मृत्यूंचे माहेरघर बनत चालला आहे. आदिवासी भागात मूलभूत आरोग्य सुविधा आजही कागदोपत्रीच असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तालुक्यात बालरोगतज्ज्ञांची कमतरता आहे, वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत, गर्भवती व नवजात बालकांच्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होते. परिणामी कोवळ्या जीवांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. बालमृत्यूचे प्रमाण वाढत असताना प्रशासन मात्र ढिम्म असून केवळ आकडेवारीपुरते काम सुरू आहे. सातपुड्यातील आदिवासी कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? कोवळ्या जीवांची पानगळ थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा केल्या जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
