मलकापूर : घिर्णी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मलकापूर यांना निवेदन देत शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली नैसर्गिक पाण्याची नाली बंद करण्यात आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी प्रत्यक्ष घटनास्थळ चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनकर्ता भागवत जनार्दन बोपले व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घिर्णी शिवारात गट क्रमांक २६८, कमांक 2६८ मधून जाणारी सुमारे पाच फूट खोल व चार ते पाच फूट रुंद अशी जुनी नाली होती. या नालीतून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह होऊन शेतीमध्ये पाणी साचत नसे. मात्र, प्रविण लक्ष्मण बगाडे (माकनेर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक) यांनी मागील उन्हाळ्यात जेसीबीच्या सहाय्याने व दोन ते तीन ट्रॉली मुरुम टाकून ही नाली बंद केली. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत बंद करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असूनसुद्धा आजपर्यंत संबंधितांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे गेल्या दोन हंगामांपासून त्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक वेळा अर्ज देऊन व तोंडी निवेदन करूनही प्रशासनाकडून काहीच कारवाई झाली नाही, अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तहसीलदारांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करावी, तसेच २०२४ पासून झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून आणि दोषींंकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.