बुलेटच्या फटाकेबाजीला आळा; फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकाच्या गाडीचा फोटो-नंबर पाठवा, त्यांना घरून उचलू – पो.नी. गणेश गिरी

मलकापूर ( दिपक इटणारे ) : मलकापूर शहरामध्ये शांततेचे वातावरण कायम राहावे म्हणून सर्वसामान्य नागरिक राबत असताना काही बुलेट चालक मात्र सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे सायलेन्सर बसवून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत हे बुलेटचालक धुमाकूळ घालत असून त्यांच्या दणदणाटाने व्यापारी, नागरिक, आजारी रुग्ण, वयोवृद्ध आणि लहान चिमुकली देखील त्रस्त झाली आहेत. स्वतःची दादागिरी दाखवण्यासाठी आणि गावात “आमचाच दबदबा आहे” असा आव आणण्यासाठी हे बुलेटचालक बिनधास्तपणे फटाके फोडत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे बुलेटचालक म्हणजे समाजाला नकोसे झालेले, “वाया गेलेल्या बापाची पोरं” आहेत.

शहरातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की बुलढाणा रोडसह इतर भागांत या बुलेटचालकांचा त्रास असह्य बनला आहे. व्यापाऱ्यांचा व्यापार बिघडतो आहे, ग्राहकांना दुकानात उभं राहणंही कठीण होत आहे. काही घरांमध्ये नुकतेच बाळ जन्माला आले असून, या बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजामुळे ती बाळं घाबरून रडतात. वयोवृद्ध नागरिकांना या आवाजामुळे डोकेदुखी व बेचैनी निर्माण होते. रात्री उशिरापर्यंत ही दहशत सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. एकूणच समाजाच्या प्रत्येक घटकाला या बुलेटचालकांच्या उपद्रवामुळे हाल सोसावे लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर मलकापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की “कोणत्याही नागरिकाला बुलेट चालकांमुळे त्रास होत असेल तर त्या गाडीचा नंबर किंवा फोटो माझ्या व्हॉट्सअॅपवर पाठवा. पाठवणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. आम्ही अशा बुलेटचालकांना घरून उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई करू. त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर जप्त करून कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल.”

या व्हाट्सएप नंबर वर पाठवा – फोटो किंवा नंबर ( 7387041111 )

गिरी यांच्या या आवाहनानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत बिनधास्तपणे गल्लीबोळात धुमाकूळ घालणाऱ्या बुलेटचालकांच्या आता धाब्याला भीती बसली आहे. नागरिकांना छळणाऱ्या आणि स्वतःचा दबदबा दाखवणाऱ्या या माजोरड्या पोरांना पोलीस आता सरळसोट धडा शिकवणार आहेत. बुलेटवर बसून फटाक्यांची दहशत माजवणारे हे चालक आता कायद्याच्या जाळ्यात अडकणार हे निश्चित झाले आहे. शहरातील शांततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नसतानाही गणेश गिरी यांनी नागरिकांना दिलेला विश्वास आणि “नाव गुपित ठेवू” हा दिलेला शब्द लोकांना धीर देणारा आहे. यातून निडरपणे लोक पुढे येतील आणि बुलेटचालकांविरोधात माहिती देतील अशी अपेक्षा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर “वाया गेलेल्या बापाच्या पोरांची ही दादागिरी आता संपणार आहे. शहराची शांतता बिघडवणाऱ्यांना पोलिसांची तंबी मिळणार आहे. गणेश गिरी यांचा कडक इशारा हे दाखवून देतो की मलकापूर शहरात कायदा सर्वात वर आहे आणि दहशत माजवणाऱ्यांना आता दया दाखवली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!