शेगाव : एका ३० वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हक्क मागावा, या कारणावरून पीडितेवर सातत्याने अत्याचार होत होते. पीडितेने शेवटी शेगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला हुरबानो मोहम्मद आगीर (वय ३०) रा. आला मस्जिद जवळ, दर्गा अली, ता. चोपडा, जि. जळगाव खांदेश, ह.मु. बाजार फैल, शेगाव यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबर २०२० पासून ४ मे २०२५ पर्यंत तिच्यावर सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. आरोपींनी पीडितेला माहेरून एक लाख रुपये आणण्याचा तसेच वडीलोपार्जित घर व शेतजमिनीत वाटा मागण्याचा दबाव टाकला. तिने नकार दिल्यानंतर मारहाण, शिवीगाळ आणि घराबाहेर हाकलण्यासारखे अमानवीय वागणूक दिली गेली. इतकेच नव्हे तर, “पुन्हा घरी आलीस तर तुला जीवाने मारून टाकू” अशी धमकी देखील दिली गेली. अखेर ४ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपी आमीर अब्दुला कच्छी, सइदा जे. कासीम अब्दुला कच्छी आणि कासीम अब्दुला कच्छी (सर्व रा. दर्गा अली, ता. चोपडा, जि. जळगाव खांदेश) यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ८४, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विवाहितेवर सासरच्यांचा अमानवीय छळ; माहेरून पैसे आणि मालमत्तेतील वाटा मागण्याचा दबाव; शेगाव येथील घटना
