मलकापूर: मालमत्तेच्या वादातून वैयक्तिक राग व्यक्त करत एक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, संबंधित महिलेला तिच्या पतीविरुद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी महिला व एका अनोळखी व्यक्तीवर अॅट्रासिटीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सौ. अनुमा समाधान इंगळे (रा. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मालकीचा फ्लॅट आरोपी रूपाली सुनिल पाटील (रा. कासमअली अपार्टमेंट, मलकापूर) हिला भाडेकरू म्हणून दिला होता. दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ८.३० ते ९ दरम्यान त्यांनी फ्लॅट रिकामा करण्याची विनंती केली असता, रूपाली पाटील व तिच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या जातीवरून अपमानास्पद शब्द वापरत शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेच्या आरोपानुसार, “आम्ही फ्लॅट खाली करणार नाही, जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या नवऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू आणि त्याला जामीन मिळू देणार नाही,” अशी धमकी आरोपी महिलेने दिली. या प्रकारामुळे फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास झाला असून, तिने तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८०/२०२५ अन्वये आरोपी रूपाली सुनिल पाटील व अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९६, ३५२, ३५१(२), ३(५), बीएनएस तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम १(१)(आर)(एस), ३(२)(व्हीए) अंतर्गत अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.