सैलानी : – बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर खेंते (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर खेंते यांनी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दीड एकर जमीन असून, त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे ५७ हजार रुपयांचे पीक कर्ज होते. गेल्या तीन वर्षांपासून शेतीतून उत्पन्न कमी होत असल्याने आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
प्रभाकर खेंते यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि ११ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.