शेगाव : – महादेव मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटल्याची घटना घडली आहे. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवकी नगर येथील रहिवासी सौ. चैताली गजानन सोनुने (वय ३२) या महिलेने महादेव मंदिरात दर्शन घेतले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील एक तोड्याहून अधिक वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.