( वृतसंस्था )नागपूर : खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा बादलीतील गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मितांशी मिलिंद मेश्राम असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मिलिंद मेश्राम (४१, न्यू लक्ष्मीनगर, वांजरा ले-आउट) हे तिचे वडील आहेत. सकाळी १० वाजताच्या सुमारास ६ जुलै रोजी ही घटना घडली. १ वर्ष ७ महिने वयाची मितांशी ही घरात खेळत होती. चालता चालता ती बाथरूममध्ये गेली. तेथे गरम पाण्याने भरलेली बादली ठेवली होती. तिचा धक्का लागल्याने बादली पडली व गरम पाणी तिच्या अंगावर सांडले. तिच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबीयांनी बाथरूमकडे धाव घेतली. समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मितांशी गंभीर जखमी झाली होती. तिला त्या अवस्थेत हिंगण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आठ दिवसांनी संपली. रविवारी सकाळी ८:१० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.