मलकापूर : शहरात पाणीटंचाई, अस्वच्छता, खराब रस्ते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन या प्रश्नांवरून नगर परिषद प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शहरवासीयांना तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा नगर परिषद कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे. प्रहारच्या वतीने १८ मे रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद मलकापूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. शहरात साफसफाईचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च होत असला तरी प्रत्यक्षात शहरात कुठेही स्वच्छता दिसून येत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तोंडावर पावसाळा असताना या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास अपघातांची शक्यता वाढणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. नगर परिषदेकडून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तात्काळ वितरित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच नगर परिषदेमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या साफसफाई कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार त्वरित अदा करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नगर परिषदेतील काही अधिकारी व कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी न लावता रजिस्टरवर हजेरी लावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणांची चौकशी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा ‘प्रहार’च्या वतीने नगर परिषद कार्यालयावर गाढव मोर्चा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.